पिंपरी – “तुझ्या नवऱ्यावर माझे प्रेम आहे. तू त्याला सोड’ अशी धमकी देत एका विवाहितेवर चाकूने वार करत खुनी हल्ला केला. चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीमध्ये हा प्रकार घडला.
या प्रकरणी जखमी महिलेने उपचार घेतल्यानंतर सोमवारी (दि. 6) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खुनी हल्ला करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी घरी असताना आरोपी महिला पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात आली. घरात येऊन आरोपी महिलेने फिर्यादी महिलेच्या तोंडावर, हातावर, गळ्यावर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादी महिला गंभीर जखमी झाली.
आरोपी महिलेने ‘माझे तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. तू त्याला सोड. मला त्याच्या बरोबर लग्न करायचे आहे. नाहीतर मी तुला जीवे ठार मारल्याशिवाय सोडणार नाही’ अशी फिर्यादी महिलेला धमकी दिली.
फिर्यादीने घडल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास त्यांच्या दोन मुलींना देखील ठार मारण्याची धमकी दिली. गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी महिलेने सुरुवातीला उपचार घेतले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.