पिंपरी – पर्यावरणाला नुकसान पोहचविणाऱ्या प्लास्टिकच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने बुधवारी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी सकाळीच पिंपरीतील मार्केटमध्ये महापालिकेचे पथक कारवाईसाठी गेले होते. मात्र कारवाई होत असल्याचे पाहताच व्यापाऱ्यांनी तातडीने बंदचे अस्त्र उगारत दुपारी 1 ते अडीच वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवली.
प्लास्टिक पर्यावरणास मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. प्लास्टिकविरोधात कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त आणि प्रशासकांनी मंगळवारीच आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेचे पथक पिंपरी मार्केटमध्ये पोहचले. दरम्यान व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वादावादी झाली.
व्यापाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांवरच आरोपांचा भडीमार केला. त्यामुळे काहीकाळ बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दुपारी 1 ते अडीच वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवली. आयुक्त राजेश पाटील यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने खुली केली.
प्लास्टिक वापरावर बंदी आहे. महापालिकेने प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. आज (बुधवारी) सकाळी महापालिकेचे पथक पिंपरी कॅम्पात गेले होते. प्लास्टिक वापर करणाऱ्या दुकानांलर कारवाई सुरु केली. पथकाने 8 ते 9 व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. एका ड्रायफुडच्या दुकानात कारवाई दरम्यान व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली.
काही ठिकाणी पाच हजार तर काही ठिकाणी दोन हजार रुपयांच्या दंडात्मक पावत्या फाडल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. आमच्याकडे प्लास्टिक नियमानुसार वापरण्यास परवानगी असलेल्या जाडीच्या बॅगा आहेत. असे असतानाही कारवाई कशी केली जात? असा सवाल व्यापाऱ्यांनी केली. प्लास्टिक उत्पादकांच्या दुकानांच्या तपासणीऐवजी किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.