सोलापूर – (प्रतिनिधी) – उजनी धरणातील सोलापूरच्या हक्काचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केल्यास आपण रान पेटवू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही. लहानपणापासून आपण सत्ता पाहिली आहे, असे सांगत उजनी धरणाचे पाणी इंदापुरला देण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरला पाणी नेण्याच्या निर्णयाला प्रणिती शिंदे यांनी कडाडून विरोध केला. प्रणिती शिंदे म्हणाल्या, उजनीचे पाणी वीस वर्षांपूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पाइपलाइनद्वारे सोलापूरला आणले. आता उजनी प्लस असूनही सोलापूर महापालिकेतून पाण्याचे नियोजन होत नाही. कॉंग्रेस सत्तेत असताना दुष्काळात सुद्धा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होते. तेव्हा उजनी मायनसमध्ये होते तरीसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत ठेवला.
दुष्काळ पडल्यानंतर देखील आम्ही हद्दवाढ भागातसुद्धा दोन दिवसआड पाणी देण्याचा प्रयत्न केला. आता उजनी प्लसमध्ये असताना सुद्धा पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय मेलो आहोत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
यासाठी रान पेटविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आम्हाला पाणी दिले पाहिजे आणि आमच्या पाण्याला हात लावू नका, अशी भूमिका घेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारलाच इशारा दिला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी नेण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आली आहे.
त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाणी उचलण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे.