मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
किशोरी पेडणेकर यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, हा त्रास अधिक वाढल्याने आज सकाळी त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या.
डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यांना नेमका काय त्रास होत आहे आणि त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज होईल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.
महापौर किशोरी पेडणेकर या सर्वात ऍक्टिव्ह महापौर म्हणून ओळखल्या जातात. कोविड संकट काळात त्यांनी स्वत: रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णालयीन व्यवस्थेची पाहणी केली होती. स्वत: नर्स असल्याने त्यांनी रुग्णांची सेवा करण्याची तयारीही दर्शवली होती.