मुंबई – खोल समुद्रात सुरू असणाऱ्या जहाजावर सुरू असणाऱ्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेता शहारूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेथून कोकेन, मेफेड्रोन आणि इत्स्कासी सारख्या अंली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला. या प्रकरणी न्यायालयाने आर्यन खानसह तिघांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा समावेश आहेत.
रेव्ह पार्टीसाठी शनिवारी सायंकाळी एक जहाज गोव्याकडे शनिवारी रवाना होणार असल्याची खबर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना 15 दिवसांपूर्वी मिळाली होती. त्या जहाजावर तिकीट खरेदी करून एनसीबीचे अधिकारी प्रवासी म्हणून हजर झाले. जहाजाने जशी मुंबई सोडली तशी जहाजावरील व्यक्तींनी अंमली पदार्थ सेवनास सुरवात केली. त्यावेळी तातडीने कारवाई करत एनसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
त्यानंतर जहाजाच्या कप्तानाल जहाज बलार्ड पिअर येथील आंतरराष्ट्रीय क्रुस टर्मिनलकडे नेण्याचे आदेश देण्यात आले. तेथून त्यांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. त्यांचे सामानही तपासणीसाठी एनसीबी कार्यालयात कडेकोट बंदोबस्तात आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
Mumbai: Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha have been sent to NCB custody till tomorrow.
They were arrested in connection with the raid at a party at a cruise off the Mumbai coast yesterday. pic.twitter.com/12MQGPPPIo
— ANI (@ANI) October 3, 2021
चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलेल्यांविरोधात पुरेसे पुरावे आमच्याकडे आहेत. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. ही पार्टी ज्यांनी आयोजित केली त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची माहिती शिपिंग कॉर्पोरेशन आणि जहाज वाहतूक मंत्रालयाला कळवण्यात येणार असल्याचे एनसीबीच्या महासंचालकांनी सांगितले.
जहाज कंपनीने सहभाग नाकारला
दरम्यान या जहाजाची कंपनी कॉर्डेलिया क्रुझ कंपनीने एका निवेदनाद्वारे या प्रकरणात आपला काही संबंध असल्याचे वृत्त फेटाळले आहे. कॉर्डेलिया क्रुझचा कोणत्याही पध्दतीने, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष या प्रकरणाशी संबंध नाही. हे जहाज दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला भाड्याने दिले होते. आम्ही प्रशासनाला पूर्ण पाठींबा आणि सहकार्य करत आहोत, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.