पुणे – थकबाकीदार ग्राहकाने विद्युत बिल वेळेत न भरल्यामुळे घराची लाईट कट करून विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे
महावितरण विभागातील कर्मचार्याला शिवीगाळ करून धक्काबुकी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी अभिजीत राजू सोनुले (वय.31,रा.भोसले नगर) याला अटक केली आहे.
याबाबत जयवंत साळुंखे (वय.28,रा. अशोकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनुले याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास राजेश्री व्हिला सोसायटी रेंजहिल रोड परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विद्युत महावितरणमध्ये कर्मचारी आहेत. साळुंखे व त्यांचे इतर सहकारी थकबाकीदार यांनी विजबील वेळेवर न भरल्यामुळे त्यांच्या घराचा विद्युत पुरवठा खंडीत केला. यावेळी आरोपी सोनुले याने आमच्या घराची लाईट जोडून द्या असे म्हणत साळुंखे यांच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुकी केली. तसेच त्यांच्या सहकार्यांना शिवीगाळ करून यादी फाडली. त्यानंतर तुमच्याकडे पाहून घेतो, तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कपील भालेराव करीत आहेत.