MP Election 2023: आम आदमी पार्टीने सोमवारी रात्री मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केली. त्यात 29 नावे आहेत. इंदूर जिल्ह्यातील तीन आणि भोपाळमधील दोन जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
आम आदमी पार्टी (AAP) ने मध्य प्रदेश विधानसभेसाठी त्यांच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 29 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यापूर्वी पहिल्या यादीत 10 उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. दुसऱ्या यादीत भाजप सोडून आम आदमी पक्षात दाखल झालेल्या माजी आमदार ममता मीना यांना चाचोडा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने प्रियांका मीणा यांना चाचोडामधून तिकीट दिल्यानंतर ममता मीना यांनी बंडखोरी करत आम आदमी पक्षात प्रवेश केला.
संध्याकाळी सभासदत्व, रात्री तिकीट
आम आदमी पक्षाने भोपाळच्या उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक मोहम्मद सौद यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी संध्याकाळी सौदने आम आदमी पक्षाचे सदस्यत्व घेतले आणि काल रात्री उशिरा त्यांचे नाव पक्षाच्या यादीत आले. सौद यांनी अपक्ष नगरसेवकाच्या निवडणुकीत आरिफ अकील यांच्या भावाचा पराभव केला होता. त्याचबरोबर भोपाळच्या नरेला विधानसभेसाठी रायशा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जिल्हा पंचायत सदस्यही उमेदवार
केन बेटवा लिंक प्रकल्पात भरपाई मिळावी यासाठी आंदोलनात सहभागी असलेल्या अमित भटनागर यांना आम आदमी पक्षाने बिजावरमधून तिकीट दिले आहे. त्याचबरोबर छतरपूरमधून जिल्हा पंचायत सदस्य भगीरथ पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पक्षाने आपले दोन प्रवक्ते, सिवनी माळवा येथून सुनील गौर आणि इंदूर-4 मधून पियुष जोशी यांना उमेदवारी दिली आहे.
अभिनेत्री चाहत पांडे दमोहमधून उमेदवार
पक्षाने अभिनेत्री चाहत पांडेला दमोह विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर मल्हारामधून चंदा किन्नर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात 39 उमेदवारांची नावे आहेत. विशेष म्हणजे या यादीत तीन केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्र्यांमध्ये मुरेनाच्या दिमानी मतदारसंघातून नरेंद्र सिंह तोमर, नरसिंगपूरमधून प्रल्हाद पटेल आणि निवासमधून फग्गनसिंग कुलस्ते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 1 मधून तिकीट देण्यात आले आहे. 17 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या पहिल्या यादीतही भाजपने 39 नावांची घोषणा केली होती, त्यामुळे हा 39 चा आकडा चर्चेत आहे.
भाजप आणि काॅंग्रेसकडून जय्यत तयारी सुरु असताना आपकडून मात्र जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक पदावरील व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आपला निवडणुक जिंकणं कठीण जाणार असल्याचे बोलले जात आहे. या बलाढ्य पक्षांपुढे आपचा किती निभाव लागणार हे निवडणुक निकालानंतरच स्पष्ट होईल.