पिंपरी – सध्या दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. लोकसभेच्या सभागृहात पीठासीन अधिकार्याचे कामकाज करण्याची संधी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना मिळणार आहे. त्यांची तालिका अध्यक्षपदाच्या पॅनेलवर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात केली.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तालिका अध्यक्षांचे पॅनेल जाहीर केले. सभागृहात अध्यक्ष उपस्थित नसल्यास उपाध्यक्ष कामकाज पाहतात. परंतु, लोकसभेत उपाध्यक्षाची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या अनुपस्थितीत तालिका अध्यक्षच कामकाज पाहतात. सभागृहातील कामकाजातील अनुभव आणि ज्येष्ठता या निकषांवर तालिका अध्यक्षांची निवड केली जाते. लोकसभा अध्यक्षांनी खासदार श्रीरंग बारणे यांची तालिका अध्यक्षांच्या पॅनेलवर निवड केली आहे. त्यामुळे बारणे यांना पीठासीन अधिकार्याचे कामकाज करण्याची संधी मिळणार आहे.
खासदार बारणे हे सलग दुसर्यावेळी खासदार आहेत. २०१४ पासून ते मावळचे प्रतिनिधित्व करतात. सभागृहाच्या कामकाजात त्यांची शंभर टक्के उपस्थिती असते. विविध चर्चेमध्ये सहभाग, मतदारसंघातील प्रश्न विचारण्यामध्ये ते आघाडीवर असतात. या कामगिरीमुळे त्यांना सलग सातवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.