मुंबई – बॉलिवूडमधील 70-80च्या दशकात आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते हरीश मॅगन यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर हरीश मॅगन यांनी “नमक हलाल’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना खूप प्रसिद्धि मिळाली होती. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
हरीश यांनी “गोलमाल’ आणि “शहंशाह’ सारख्या प्रसिद्ध चित्रपटातही काम केले आहे. हरीश यांच्या मृत्यूपश्चात पत्नी, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरूषी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
1 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला पण दोन दिवसांनी त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. हरीश हे अनेक काळापासून सिनेसृष्टीपासून दूर होते. असे असले तरी ते मुंबईत स्वत:ची अभिनय कार्यशाळा चालवत होते.
दरम्यान, हरीश यांचा जन्म 6 डिसेंबर 1946 साली झाला. त्यांनी एफटीआयआयमधून अभिनयाचे शिक्षण घेतले होते. 1974च्या बॅचचे ते विद्यार्थी होते. “चुपके चुपके’, “मुक्कदर का सिंकदर’ 1997मध्ये आलेल्या “उफ्फ ये मोहब्बत’ सारख्या सिनेमात त्यांनी काम केले होते.