पुणे – डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या पिनाक आनप आणि आनंद रघुवंशी यांनी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पिनाक आणि आनंद यांच्यामध्ये आता विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अतितटीच्या खेळल्या गेलेल्या सामन्यात पिनाक आनप याने पुना क्लबच्या सुरज राठी याचा ४-३ असा पराभव केला. ७ फ्रेमच्या सामन्यामध्ये पिनाक याने पहिली फ्रेम ६२-२६ अशी जिंकून १-० अशी सुरेख सुरूवात केली. सुरज याने दुसरी फ्रेम ३९-०७ अशी जिंकून १-१ अशी बरोबरी करत सामना एकतर्फी होणार नाही याची श्वाश्वती दिली.
तिसर्या फ्रेममध्ये सुरज यानेच ५८-१७ बाजी मारत २-१ अशी आघाडी घेतली. पिनाक याने चौथी फ्रेम ३८-१७ अशी जिंकून सामन्यात २-२ अशी बरोबरी निर्माण केली. सुरजने ६९-२७ अशी पाचवी फ्रेम जिंकून ३-२ अशी आघाडी घेतली. सामना जिंकण्यासाठी सुरज याला केवळ एका फ्रेम जिंकण्याची आवश्यकता होती. यानंतरही दबावाखाली पिनाक याने ३३-१८ अशा १५ गुण फरकाने सहावी फ्रेम जिंकून सामन्यामध्ये ३-३ अशी बरोबरी निर्माण केली.
Motilal Oswal Trophy (Snooker) : पिनाक, आनंद, सुरज, अभिजीत उपांत्य फेरीत…
अंतिम आणि निर्णायक फ्रेममध्ये पिनाक याने सुरजपेक्षा अधिक सरस खेळ करत ६७-४६ अशा गुणांनी फ्रेमसह सामन्यामध्ये विजय मिळवला. दुसर्या उपांत्य फेरीमध्ये आनंद रघुवंशी याने अभिजीत रानडे याचा ४७-३६, ३३-०७, ७५-५०, १२-३७, ५८-४५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.