पुणे : लोहगाव विमानतळावर करोनानंतर प्रथमच सर्वाधिक प्रवाशांची नोंद झाली आहे. यात एकट्या मे मध्ये 6 लाख 69 हजार प्रवाशांनी उड्डाण केले. केंद्र सरकारने विमान वाहतुकीचे नियम ऑक्टोबर 2021 पासून टप्प्याटप्प्याने शिथिल केले. यामुळे लोहगाव विमानतळावरून विमानांची उड्डाणांची संख्या वाढत गेली. सध्या येथून दररोज सरासरी 160 विमाने टेकऑफ आणि तेवढीच विमाने लॅन्डिंग करतात. त्यामधून सरासरी 22 हजार प्रवासी असतात.
करोनापूर्वी येथून दिवसाला 180 ते 200 विमानांचे उड्डाण होत असत. त्याद्वारे सुमारे 25 हजार प्रवासी ये-जा करायचे. करोना काळात यात घट झाली होती. पण जानेवारी 2022 पासून प्रवाशांच्या संख्येत वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात करोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून विमानांचे उड्डाण सुरू होते. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने करोना प्रतिबंधाचे नियम शिथिल केल्याने प्रवाशांची संख्यादेखील वाढू लागली. त्यामुळे मे मध्ये हा आकडा पावणेसात लाखांच्या घरात गेला आहे.
महिना प्रवासी संख्या
जानेवारी 3,28,357
फेब्रुवारी 3,82,085
मार्च 5,59,396
एप्रिल 5,03,606
मे 6,69,464