वॉशिंग्टन: अमेरिकेनंतर भारतात करोनाच्या सर्वाधिक चाचण्या घेतल्या गेल्या आहेत असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत 42 दशलक्ष करोना चाचण्या घेण्यात आल्या असून हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
अमेरिकेच्या खालोखाल भारताचा नंबर लागला असून भारतात आत्तापर्यंत करोनच्या 12 दलक्ष चाचण्या (1 कोटी 20 लाख) घेतल्या आहेत असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या केली मॅकेनॅनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या की, अमेरिका करोना नियंत्रणाची लढाई प्रत्येक पातळीवर करीत असून आम्ही जगातील अन्य कोणत्याही देशाने घेतल्या नाहीत इतक्या प्रचंड चाचण्या घेतल्या आहेत.
अमेरिकेत या आधीच्या काळातही एच1एन1 फ्लु सारखे साथीचे रोग पसरले होते. पण खुद्द अमेरिकेतही यापूर्वी आरोग्याच्या बाबतीत इतक्या व्यापक प्रमाणातील चाचण्या कधीच घेतल्या गेल्या नव्हत्या असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी केवळ अमेरिकतच नव्हे तर संपूर्ण जगात करोना चाचण्या घेण्याचा अधिक प्रसार केला आणि संपूर्ण जगभर अमेरिकेने व्हेंटिलेटर्सचे वाटप केले असेही त्यांनी नमूद केले.
करोनावर माडेर्ना लस तयार होत असून या लसीची तिसरा टप्पा लवकरच पूर्ण होत आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये 30 हजार पेशंटसवर चाचण्या घेतल्या जातील असे त्यांनी नमूद केले.