- महिलांचे आरक्षण
- गावकी-भावकी आता आमने-सामने
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये 25 पेक्षा जास्त पुरूष विद्यमान नगरसेवकांना घरी बसण्याची वेळ आली आहे. या सर्व उमेदवारांच्या जागी महिलांचे आरक्षण पडल्यामुळे या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. तर अनेक गावकी-भावकीतील इच्छुक आमने-सामने येणार असल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पिंपळे गुरव, चिंचवडगाव, चिखली, काळेवाडी, भोसरीगावठाणमधील अनेक विद्यमान पुरूष नगरसेवकांना महिला आरक्षणाचा जबर फटका बसला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2022 या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आज (मंगळवार) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. सुरूवातीला अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आरक्षण सोडतीची कार्य पध्दती सांगितली. याप्रसंगी महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, विठ्ठल जोशी, अण्णा बोदडे आदी अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीच्या माजी सभापती सिमा सावळे, सारंग कामतेकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अरूण पवार यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी महापालिकेत 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 22, अनुसूचित जमातीसाठी 3 तर 114 जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत. एकूण 25 प्रभागात दोन महिला उमेदवार येणार असल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे.
सर्वसाधारण महिलांसाठी 57 जागा आहेत. त्यातील 45 जागा थेट पद्धतीने राखीव झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 46 मध्ये थेटपद्धतीने एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव केली. त्यामुळे 12 प्रभागासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी 40, 12, 36, 7, 21, 13, 1, 42, 8, 31, 27, 30 हे प्रभाग राखीव झाले. तर उर्वरित प्रभाग हे पुरूषांसाठी राखीव झाले आहेत.
यांना बसला फटका
चिंचवडगावात एक पुरूष पडल्याने दोन विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे. पिंपळे सौदागरमधील सागर आंघोळकर आणि अंबरनाथ कांबळे यांच्यापैकी एकाला घरी बसावे लागणार आहे. पिंपळे गुरवमधील प्रभाग 46 मध्ये एक पुरूष, एक एससी, दोन महिलांचे आरक्षण पडले आहे. यामुळे स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, विद्यमान नगरसेवक हर्षल ढोरे यांची अडचण झाली हे पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तसेच भोसरी गावठाणामध्ये दोन महिलांचे आरक्षण पडले असल्याने संतोष लोंढे आणि दोन स्थायी समितीचे सभापती समोरा-समोर येणार आहे. चिखलीमध्येही दोन विद्यमान पुरूष नगरसेवकांपैकी एकाला घरात बसावे लागणार आहे. काळेवाडीत दोन महिलांचे आरक्षण पडल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे यांची अडचण झाली आहे.
एससी पुरूष राखीव प्रभाग क्रमांक
29, 22, 16, 17, 44, 39, 32, 46,2, 25, 38
एससी महिला राखीव प्रभाग क्रमांक
19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14
एसटीमध्ये-44, 41 महिलांसाठी तर प्रभाग क्रमांक 6 हा पुरूषासाठी राखीव झाला आहे.