“हवे ते मिळवण्यासाठी मोदींकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर”

कोईमतूर  -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी तामीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर टीकेची झोड उठवली. हवे ते मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो, असा आरोप त्यांनी केला.

तामीळनाडूत एप्रिल-मेमध्ये निवडणूक अपेक्षित आहे. त्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कॉंग्रेसजनांचे मनोबल उंचावण्याच्या उद्देशातून राहुल तामीळनाडूच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झाले. विशेष व्हॅनमधून विविध ठिकाणी जात त्यांनी तामीळी जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी केलेल्या भाषणांत त्यांनी प्रामुख्याने मोदींना लक्ष्य केले. कुणालाही विकत घेऊ शकतो आणि घाबरवू शकतो, असे मोदींना वाटते. तामीळनाडू सरकारचे नियंत्रण मोदींकडे आहे. राज्यातील जनतेबाबतही तसे करता येईल असे त्यांना वाटते. मात्र, तामीळी जनता तसे होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

देशातील तीन-चार बड्या उद्योगपतींशी भागीदारी करून मोदी जनतेच्या मालकीचे सर्व काही विकत आहेत. आता शेतकऱ्यांबाबतही केंद्रीय कृषी कायद्यांच्या माध्यमातून तसेच करण्याचा प्रयत्न आहे. तसे घडू नये यासाठी कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. गरीब, शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक यांचा सन्मान करणारे सरकार तामीळनाडूला हवे. तसे सरकार आणण्यासाठी मदत करण्याची माझी इच्छा आहे, अशी भूमिका राहुल यांनी मांडली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.