ट्रम्प यांच्यावरील महाभियोग सोमवारी सिनेटमध्ये

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाला सोमवारी सिनेटमध्ये पाठवले जाणार आहे. प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान कॅपिटॉलमध्ये हिंसाचाराला चिथावणी देण्याच्या आरोपावर सुनावणी होणार आहे, असे सिनेटच्या बहुमत नेते चक स्कूमर यांनी शुक्रवारी सांगितले.

ही पूर्ण सुनावणी असून त्यामध्ये पूर्ण पारदर्शकता राखली जाईल. दोन वेळेला महाभियोगाला सामोरे जावे लागलेले आणि अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही महाभियोगाला सामोरे जावे लागणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष असतील, असेही स्कूमर म्हणाले.

महाभियोगाच्या या प्रक्रियेला एकूण किती कालावधी लागेल, हे अनिश्‍चित आहे. सिनेटमध्ये सध्या डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व आहे. तसेच नवीन अध्यक्ष जो बयडेन यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यासाठी सिनेट सध्या व्यस्त आहे. सिनेटमधील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांबरोबरही महाभियोगाबाबत चर्चा सुरू असल्याचे स्कूमर यांनी सांगितले. 

कॅपिटोलमध्ये 6 जानेवारीला ट्रम्प समर्थकांनी घुसून जो धुडगूस घातला होता, त्याला ट्रम्प यांनीच चिथावणी दिली होती, हा ट्रम्प यांच्यावरील प्रमुख आरोप असणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असलेल्या प्रतिनिधीगृहाने यापूर्वीच ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाच्या ठरावाला मंजूरी दिली आहे. 

ट्रम्प आता पदावरून पायउतार झालेले असल्यामुळे त्यांना गुन्ह्याच्या शिक्षेतून सवलत दिली जाऊ शकत नाही, असे पेलोसी यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्यावर महाभियोग मंजूर झाल्यास त्यांना पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणूकीला उभे राहता येऊ शकणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.