पाटणा ( Modi surname case on Rahul Gandhi ) – मोदी नावाचे सर्व चोर असतात, या टीकेप्रकरणी पाटणा विशेष दंडाधिकारी न्यायालयाने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना 25 एप्रिल 2023 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. याआधी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना याच प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे.
पाटणा न्यायालयात 12 एप्रिलला राहुल गांधी यांना हजर राहायचे होते. राहुल गांधी यांना 13 एप्रिलला सुरत न्यायालयात जायचे आहे. त्यामुळे ते आज न्यायालयात हजर झाले नाहीत. ते 25 एप्रिलला न्यायालयात हजर राहतील, असे राहुल गांधी यांचे वकील अंशुल यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच राहुल गांधी यांचा जामीन रद्द करुन त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करावे, अशी मागणी भाजपचे खासदार सुशील मोदी यांचे वकील एस. डी. संजय व प्रिया गुप्ता यांनी केली. अखेर न्यायालयाने राहुल गांधी यांना 25 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले.
19 एप्रिल 2019 रोजी राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर टीका केली होती. ही टीका नसून राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी समुदायाचा अवमान केला आहे, अशी तक्रार खासदार सुशील मोदी यांनी पाटणा न्यायालयात केली आहे. त्या तक्रारीवर आज सुनावणी पार पडली.
दरम्यान, गतमहिन्यात 23 मार्चला सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मोदी आडनावावरील टीकेप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. शिक्षा ठोठावताना न्यायालयाने राहुल गांधींना विचारले की तुम्हाला काय म्हणायचे आहे, तेव्हा राहुल गांधी म्हणाले, मी नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतो. मी मुद्दाम कोणाच्या विरोधात बोललो नाही. यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. त्यानंतर राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावण्यात आली. न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांनी या शिक्षेला आव्हान दिले आहे.