मनसेचे जिल्हाध्यक्ष सातव भाजपच्या वाटेवर

हवेली तालुक्‍यात भाजपकडून व्होट बॅंक मजबूत

वाघोली – पुणे जिल्हा मनसेचे अध्यक्ष संदीप सातव हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय भेगडे, खासदार गिरीश बापट, शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष गणेश कुटे यांनी दिली. दरम्यान, सातव यांच्या प्रवेशामुळे हवेली तालुक्‍यातील भाजपची व्होट बॅंक मजबूत होणार आहे.

हवेली तालुक्‍यातील अनेक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सातव यांनी आंदोलने केली असल्याने सातव यांची ओळख जनमानसात झाली आहे. वाघोलीच्या वाहतूक कोंडीतून मुक्‍तता करण्यासाठी, पिण्याची योजना मंजूर करण्यासाठी सातव यांनी पाठपुरावा केला आहे. मनसेच्या स्थापनेपासून युवकाचे संघटन करून शिरूर हवेलीत सातव यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिरूर- हवेलीचे आमदार पाचर्णे यांच्यासमवेत सातव यांची नुकतीच बैठक झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत कोल्हापूर येथे बैठक झाली आहे. वाघोलीमधून शिवसेना आणि भाजप युतीला लोकसभेच्या निवडणुकीत निर्णायक मतांची आघाडी मिळाली असल्याने सातव यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. संदीप सातव लवकरच पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाजप उपाध्यक्ष गणेश कुटे यांनी सांगितले आहे. याबाबत वाघोलीचे माजी उपसरपंच संदीप सातव लवकरच प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.