अमरावती – अमरावतीत राणा दांपत्य आणि पोलीस विभागाचा वाद आता टोकाला पोहचला आहे. आता आमदार रवी राणा यांनी थेट अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांना निलंबित करून तुरूंगात टाकण्याची धमकी दिली आहे.
पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची सीमा ओलांडली असून आता सहन होणार नाही. आरती सिंह यांची पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करून ईडी, सीबीआय चौकशी करून तुरूंगात टाकणार असल्याची धमकीच आमदार रवी राणा यांनी दिली.
रवी राणा म्हणाले, अमरावतीमध्ये आरती सिंह यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. पैसे घेऊन गुन्हेगारांशी सेटलमेंट त्या करत आहेत. या आधी त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केले त्या-त्या ठिकाणीही असाच भ्रष्टाचार केला आहे. माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल करायचा आहे तो दाखल करा, त्याला उत्तर मी देईन, असे ते म्हणाले.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून बुधवारी पोलीस आयुक्तांना नवी दिल्ली येथे 6 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश मिळाले आणि रात्री आमदार रवी राणा यांच्या पार्टीच्या शहर अध्यक्षाला अटक झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.