पिंपरी – चिखली घरकुल प्रकल्पातील विविध प्रलंबित विकासकामे व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून प्रस्तावित कामे मार्गी लावावी, अशी सूचना केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम अंतर्गत चिखली से. क्र. 17 व 19 येथे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी प्रकल्प राबवण्यात आला आहे. घरकुल प्रकल्पात एकूण 6 हजार 426 सदनिका आहेत. त्याचे लाभार्थ्यांना वाटपही झाले आहे.
चिखली घरकुल प्रकल्पात प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी जागा आरक्षित आहे. या परिसरात सुमारे 30 हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळेचे आरक्षण विकसित करणे अत्यावश्यक आहे. मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोकळ्या जागेतील 15 ते 20 गुंठे जागा पोलीस स्टेशन उभारणेकामी देण्यात यावी. त्यासाठी जागा ताबा घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना केली आहे. घरकुलमधील टाऊनहॉल आणि लायब्ररी हे आरक्षण विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करुन भोगवाटा प्रमाणपत्र प्राप्त करुन नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.
पदपथ, रस्ते विकासाला प्राधान्य
फूटपाथ 7 ते 8 वर्षांपूर्वी बनविण्यात आल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. नव्याने पदपथ विकसित करणे अत्यावश्यक आहे. तसेच, विविध विकासकामांसाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती व नव्याने विकसित करणे अत्यंत निकडीचे आहे. यासह ज्या इमारतींचे वाटप करणे प्रस्तावित आहे. त्या भागातील अंतर्गत रस्तेही विकसित करावेत, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.