MLA Kulwant Singh : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई अजूनही सुरूच आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आता पंजाबमधील मोहालीचे आप आमदार कुलवंत सिंह यांच्या घरावर ईडीकडून छापे टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या कार्यालयावर तसेच निवासस्थानी ईडीने धाड टाकली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडी सध्या अमृतसर, लुधियाना आणि मोहाली येथील मद्य विक्रेत्यांवर कडक कारवाई करत आहे. या प्रकरणी झालेल्या घोटाळ्या संदर्भात ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी कुलवंत सिंग यांच्या घर आणि कार्यालयात असलेल्या कागदपत्रांची तपासणी करत आहे.
कुलवंत सिंग यांच्या घरावर कोणत्या प्रकरणात छापा टाकण्यात आला आहे, याबाबत ईडीने अजूनतरी अधिकृतपणे माहिती दिलेली नाही, मात्र, हा छापा केवळ दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. याबाबत राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी भगवंत मान यांना पत्र लिहिले होते. तुमचा आमदारच इथे रिअल इस्टेटचा व्यवसाय करत असल्याचे त्यांनी मान यांना सांगितले. रिअल इस्टेट नावाखाली ते नियमांचेही उल्लंघन करत आहेत. ज्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे” अशा कडक शब्दात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले होते.
दरम्यान, आपचे आमदार कुलवंत सिंह हे व्यापारी आहेत. त्यांचा जन्म पंजाबमधील रुपनगर येथील सामना कलान येथील लष्करी रामदासिया शीख कुटुंबात झाला. ते आपले गाव सोडून जिरकपूरला गेले आणि तीन वर्षे तेथे ट्रक व इतर अवजड वाहनांचे वजन करत असे. गव्हाच्या पेंढ्याचा साठा विकण्यासाठी त्यांनी घोडागाडीही चालवली. कुलवंत सिंग जनता लँड प्रमोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि त्यांची 1500 कोटी रुपयांची उलाढाल आहे. मोहालीच्या सेक्टर 82 मध्ये त्याच्याकडे दोन दुकाने-कम-ऑफिससह दोन व्यावसायिक इमारती आहेत. पंजाब आणि हिमाचल प्रदेशात त्यांची अनेक मालमत्ता आहेत.