‘तो’ बेपत्ता जवान माओवाद्यांच्या ताब्यात

पत्रकारांना दूरध्वनीवर माहिती, एकला कथित हिडमाचा फोन

बिजापूर  – सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमांवर पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या घनघोर घुमश्‍चक्रित केंद्रीय राखीव पोलिस दलाचा बेपत्ता झालेला कमांडो माओवाद्यांच्या ताब्यात असल्याचे निनावी फोन आल्याचा दावा दोन पत्रकारांनी केला आहे. हा कमांडो सुरक्षित असून त्याल कोणतीही इजा केली नाही, असे दूरध्वनी करणाऱ्याने सांगितल्याचा दावा या पत्रकारांनी केला आहे.

तेरम भागातील जंगलात चकमक उडून दोन दिवस उलटल्यानंतर दोन दिवसांनी ही बाब समोर आली आहे. शनिवारी सुमारे 600 माओवादी आणि त्यांच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर हल्ला चढवला. त्यात 22 जवान शहीद झाले. कुख्यात माओवादी कमांडर हिडमा याने या हल्ल्याचे नेतृत्व केल्याचे मानण्यात येते. नक्षलवाद्यांकडून आजवर केलेल्या भीषण हल्ल्यातील हा एक हल्ला होता.

दूरध्वनी करणाऱ्याने त्याची ओळख सांगितली नाही. मात्र तो म्हणाला, या दोन ते तीन दिवसांत या जवानाची सुटका करण्यात येईल, असे पत्रकार गणेश मिश्रा यांनी सांगितले. मिश्रा हे प्रेस क्‍लबचे अध्यक्षही आहेत. दोन पत्रकारांपैकी एक दूरध्वनी त्यांना आला होता.

सुकमा येथील नवभारतचे पत्रकार राजासिंग राठोड यांनी आपल्याला दूरध्वनी आल्याचा दावा केला. मात्र त्यांनी फोन करणारा स्वत:ची ओळख हिडमा अशी देत होता, असे सांगितले. ते म्हणाले, फोन करणाऱ्याने सांगितले की बेपत्ता जवान आमच्या कोठडीत आहे. त्याच्या ख्याली खुशालीबाबत विचारता ते म्हणाले, तो सुरक्षित आहे. स्वत:ची ओळख हिडमा असे सांगत तो म्हणाला त्याची छायाचित्रे आणि अन्य तपशील लवकरच देण्यात येईल.

बिजापूरच्या पोलिस अधिकांना निनावी दूरध्वनी आल्याचे बोलले जात होते. मात्र अधिक्षक कामलोचन कश्‍यप यांनी हे वृत्त फेटाळून लावले. हा जवान माओवाद्यांच्या ताब्यात असू शकतो. ही चकमक उडाल्यानंतर सुरक्षा दलांनी पाच ते सहा किलोमिटरच्या त्रिज्येच्या परिसरात त्यांचा शोध घेण्याच प्रयत्न केला. मात्र, ते आढळले नाहीत, असे कश्‍यप म्हणाले. या कमांडोला शोध घेण्याचे प्रयत्न युध्द पातळीवर सुरू आहेत. पत्रकारांना आलेल्या फोनची सत्यता पडताळणी करण्यात येत आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.