“करोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त डॉक्‍टर्स”

मुंबई  – राज्यात करोनाची स्थिती गंभीर होताना दिसत आहे. करोनाचा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. यानुसार 5200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्‍य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अमित देशमुख म्हणाले, राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामुळे करोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात डॉक्‍टर्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जीएनएम आणि एएनएम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा त्या-त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील. राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करताना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्‍टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.