मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. करोनाची बाधा झाल्यामुळे त्याला रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्याती आले होते. आता त्याची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत सचिनने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि विजेतेपद देखील मिळवले. रायपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेनंतर मुंबईत आल्यावर सचिनला करोनाची सौम्य लक्षणे दिसू लागली. करोना चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. करोना झाल्याची माहिती सचिनने सोशल मीडियावरून दिली होती. त्यानंतर सचिन रुग्णालयात दाखल झाला.
सचिनच्या प्रकृती संदर्भात सर्वजण काळजीत आहेत. करोनाची लक्षणे आढळल्यानंतर एका आठवड्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर देखील सचिनने शुभेच्छा आणि प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले होते.
सचिनची प्रकृती उत्तम असून केवळ खबरदारी म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सचिन रुग्णालयात यासाठी दाखल झाला कारण तेथे योग्यरित्या देखरेख होईल. त्याला करोनाची सौम्य लक्षणे होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणे गरजेचे होते.
मुंबईतील गोरेगाव येथील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात सचिनला दाखल करण्यात आले आहे. याच रुग्णालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील याच रुग्णालयात उपचार घेत आहेत.