बेंगळुरू -रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सोमवारी झालेल्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सचा लेग स्पीन गोलंदाज अमित मिश्रा याने केलेल्या एका कृतीमुळे आता त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याने गोलंदाजीदरम्यान चेंडू हाताळताना त्याला लाळ लावल्याचा व्हिडिओ समोर आला असून त्यावर सामनाधिकारी तसेच मैदानावरील पंचांनी ताशेरे ओढले होते. या घटनेनंतर चेंडूला सॅनिटायझर लावून तो साफ करत मिश्रालाही तंबी देण्यात आली होती.
मिश्राने कोविड-19 बाबतच्या या नियमाचा भंग केल्याचे सिद्ध झाले आहे. चेंडूची चमक टिकावी म्हणून मिश्रा चेंडूच्या एका बाजूला लाळ लावत असल्याचे कॅमेरा रिप्लेमध्येही स्पष्ट दिसून आले. हे पाहिल्यावर पंचांनी लगेचच त्याला ही चूक निदर्शनास आणून दिली.
बेंगळुरूची फलंदाजी सुरू असताना 12 वे षटक मिश्रा टाकत होता, त्यावेळी हे घडले. चेंडूला लाळ लावल्यावर जास्त फिरकी मिळण्यास मदत होते. मिश्राने याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेंगळुरूच्या विराट कोहलीला बाद केले.
करोनाबाबतचे नियम तयार करताना अन्य कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी चेंडूला लाळ (थुंकी) लावण्यावर आयसीसीसह सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांनी बंदी केली आहे. हा नियम माहिती असूनही मिश्राकडून हे घडल्याने आता केवळ समज किंवा तंबी देत या प्रकरणावर पडदा पडणार नसून त्याच्यावर कठोर कारवाईही केली जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
जर या नियमाचा भंग केला तर गोलंदाजी करत असलेल्या संघाला 5 धावांचा दंड केला जातो. तसेच नियम माहिती असतानाही जर हे घडले असेल तर त्यापेक्षाही कठोर कारवाई केली जाऊ शकते, त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.