पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेप 

मुलाला घराबाहेर काढून मारहाण करत तिच्यावर केला अत्याचार 

पुणे – मुलास घराबाहेर काढून दरवाजा बंद करून पोटच्या 15 वर्षीय मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप आणि 9 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास त्याला एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. दंड भरल्यास त्यातील पाच हजार रुपये पीडित मुलीला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

काळेवाडी भागात राहणाऱ्या 50 वर्षीय वडिलांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेने स्वत: फिर्याद दिली आहे. ही घटना 31 ऑगस्ट 2015 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. पीडितेची आई कामाला बाहेर गेली होती. पीडित, भाऊ घरात होता.

आरोपीने मुलाला म्हणजे पीडितेच्या बाहेर जाण्यास सांगून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित, तिची आई आणि भावाची साक्ष महत्त्वाची ठरली.

वाकड पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस.धुमाळ यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गवारी यांनी मदत केली. मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी वडिलांची आहे. त्या वडिलांनी बलात्कार करणे म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. पाठक यांनी केली.

त्यानुसार न्यायालयाने त्याला भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार जन्मठेप आणि सात हजार रुपये दंड, भादवी कलम 506 (धमकाविणे) आणि 323 (मारहाण) नुसार प्रत्येकी 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×