पुणे – वडगाव बुद्रुक परिसरात मैत्रिणीशी गप्पा मारत थांबलेल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून खून केल्याची घटना रविवारी (दि. 25) दुपारी घडली. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नागेश ऊर्फ सिल्वर सिद्धाप्पा चिंचोळे (वय 17, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. नागेश परिसरातील घुल नगर भागात असलेल्या मोकळ्या जागेत मैत्रिणीशी गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात बिअरची बाटली आणि कुंडी घातली. या हल्ल्यात नागेशगंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. भरदिवसा अल्पवयीन मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस हल्लेखोराच्या मागावर असून, आरोपींना लवकर अटक करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.