प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -महापालिकेतील थकीत कर वसुलीबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन दि. 12 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात येईल. समान पाणीपुरवठा योजनांचे वॉर्डनिहाय कामे तातडीने पूर्ण करावे. जायका प्रकल्पासंबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या प्रकल्पाची कामे ऑक्टोबरपर्यंत सुरू होतील यासाठी योजना तयार करावी, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
विकास कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार, डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त अजित देशमुख, पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, साहेबराब दांडगे, प्रकल्प मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यसाठी प्रशासनाने कामे पूर्ण करावीत. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या दृष्टीने प्रशासनाने सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा. निवडक रस्त्यांसाठी अल्प मुदतीची निविदा काढून कामे त्वरित करावी, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.