प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -शहरातील गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून यंदा पाच वर्षांसाठीचा परवाना देण्यात येणार आहे. त्यासाठी 2019 मध्ये देण्यात आलेला परवाना गृहीत धरला जाणार आहे. त्यानुसार मंडळानी परवान्यात नमूद केलेल्या नियमांचे पालन केले आहे किंवा नाही याची तपासणी सोमवारपासून केली जाणार आहे.
याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. एखाद्या मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने शहरात 2019 मध्ये सुमारे 2,300 गणेश मंडळांना परवाने दिलेले होते.
यंदा उत्सव निर्बंधमुक्त केला जाणार आहे. त्यामुळे भव्य मांडव तसेच देखावे सादर होणार आहेत. गणेशोत्सवासाठी मांडव घालताना वाहतूक कोंडी अथवा अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळे होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने मांडवाचे धोरण केले आहे. त्यानुसार किती आकाराच्या रस्त्यावर किती मांडव घालता येईल याचे नियम मंडळांना परवाना देताना बंधनकारक केले आहे. यावर्षी 2019 च्या परवान्यावरच मांडव उभारणाऱ्या मंडळाकडून त्यानुसार नियमांचे पालन केले आहे की नाही याची तपासणी क्षेत्रीय कार्यालये करणार आहेत.