सिंहगडरस्ता, दि. 10 (प्रतिनिधी) – सिंहगड रस्त्यावरील पालिकेच्या मालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून बांधलेले अनेक प्रकल्प धुळखात पडले आहेत. प्रशासकांना याबाबत निर्णय घेता आले असते. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला परंतु, याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले गेले असल्याचे या भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.
आनंदनगर सन सिटी रस्ता येथे पालिकेतर्फे भाजी मार्केट बांधण्यात आले. परंतु, ग्राहक येत नसल्याचे कारण सांगत विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यावरच दुकान मांडले आहे. त्यामुळे भाजी मार्केट वापराअभावी पडून आहे. या भागातील स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे जलतरण तलाव करोना काळानंतर दोन-तीन वर्षांपासून बंद आहे. विठ्ठलवाडी भागात पालिकेतर्फे बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते ही इमारतही बऱ्याच वर्षांपासून रिकामीच आहे. वडगाव बुद्रुक भागात शरद पवार ई-लर्निंग स्कूलचे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या परिसरातील तीन शाळांचे स्थलांतर या भव्य इमारतीमध्ये करण्याचे नियोजन रेंगाळले आहे. अद्यापही ही इमारत शाळांसाठी खुली करण्यात आलेली नाही.
वडगाव बुद्रुक भागात कृष्णा गेणू भाऊ दांगट संस्कृतिक भवन, कै. विठ्ठलराव नामदेव जाधव क्रीडा संकुल, भारतरत्न पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी प्राथमिक विद्यालय, स्व. सुषमाजी स्वराज महिला बचत गट भवन या इमारतीचे बांधकामावरही पालिकेकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला. परंतु, सध्या या इमारती वापरात नाहीत. श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले नाट्यगृहाचे बांधकाम अर्धवट आहे तसेच भिडे उद्यान येथील कामही निधी अभावी रखडले आहे.
महानगरपालिकेचे हे प्रकल्प, इमारती नागरिकांसाठी लवकरात लवकर वापरात याव्यात म्हणून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. सध्या, प्रशासक राज सुरू असल्याने याबाबत कोणताच निर्णय घेतला जात नाही.
– हरिदास चरवड, माजी नगरसेवक
शरद पवार ई लर्निंग स्कूलमध्ये या भागातील शाळेचे स्थलांतर व्हावे म्हणून पाठपुरावा केला आहे. तरी शाळेचे स्थलांतर लवकरात लवकर व्हावे अशी मागणी सातत्याने करीत आहे. प्रशासकांनी याबाबत ठोस निर्णय घ्यावी, अशी मागणी आहे.
– दशरथ मणेरे, पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस
या विभागातील पालिकेच्या शाळा भाडे तत्वावारील इमारतीमध्ये भरतात, त्याचे भाडे पालिकेला भरावे लागते. स्वतःच्या इमारती धुळखात पडलेल्या असताना असा खर्च योग्य नाही, प्रशासकांनी योग्य तो निर्णय घ्यावा.
– महेश पोकळे, विभाग प्रमुख, शिवसेना