प्रकल्प प्रमुख दशरथ माने यांची माहिती
लासुर्णे- इंदापूर तालुक्यातील सोनाई दूध संघाकडून दूध खरेदीच्या दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटरला 30 रुपये दर देणार असल्याचे सोनाई प्रकल्पाचे प्रमुख दशरथ माने यांनी सांगितले.
राज्यामध्ये चालू वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे व कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे राज्यात दुधाचा तुटवडा जाणवत आहे. याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ लागला आहे. सोनाई दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या दुधाला 28 रुपयांचा दर देण्यात येत होता. मात्र दि. 1 सप्टेंबर पासून या गुणवत्तेच्या दुधाला प्रतिलिटरला 30 रुपयांचा दर देण्यात येणार आहे. दूध दरवाढीचा राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
यासंदर्भात सोनाई प्रकल्पाचे प्रमुख दशरथ माने यांनी सांगितले की, दुग्धजन्य पदार्थ परदेशामध्ये निर्यात करण्यामध्ये सोनाईचा राज्यात पहिला व देशात दुसरा क्रमांक आहे. सध्या, राज्यातील दुग्धव्यवसाय करणारा शेतकरी अडचणीमध्ये असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी थेट 2 रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज 25 लाख लिटर दूध हाताळण्याची क्षमता असणारा सोनाईचा आधुनिक प्रकल्प असून नव्याने चीज व पनीर प्रकल्प ही सुरु होत आहे. सोनाईचे पनीर सहा महिन्यांपर्यंत वापरण्यात येणार आहे. तसेच सोनाईच्या दर्जेदार पशुखाद्यामुळे जनावरांची दूध देण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोनाई उद्योग समूहाचे प्रयत्न सुरु असल्याचे माने यांनी सांगितले.