पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड मेट्रोमुळे शहराच्या स्मार्टपणात वाढ होत असतानाच मेट्रो स्टेशनच्या परिसरात अनधिकृत वसत असेलल्या टपऱ्या स्क्रॅप गोदाम आदींमुळे त्याच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे.
बोपोडी मेट्रो स्टेशनपासून ५० फूट अंतरावर वस्तीत अनधिकृतपणे भंगार साहित्याचे गोडाऊन करण्यात आले आहे. प्लॅस्टिक वस्तू, रबर, बॅरेल, केमियुक्त साठा, अल्युमिनियम, केबल, रद्दी या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्यचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
या भंगार साहित्यामधील वायरिंगला सोमवारी (१८ मार्च) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन वाहनांकडून ती आग आटोक्यात आणली.
मात्र, शेजारीच असणाऱ्या केमिकल्सयुक्त भंगार साहित्याला आग लागली असती तर मोठ्या जीवित आणि वित्तीय हानीला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे अनधिकृतपणे भंगार साहित्याच्या गोडाऊनवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमी करत आहेत.
सध्या उन्हाच्या झळा सकाळपासूनच जाणवत आहेत. परिणामी आगीच्या घटना घडतात. नागरी वस्तीत आणि मेट्रो स्टेशनजवळ भंगार व्यवसायाचे अनधिकृत दुकान थाटण्यात आले आहे. या भंगार साहित्यात रबर, प्लास्टिक, इतर केमिकलयुक्त साहित्य, गॅस सिलेंडर, तेलाचे बॅरेल, अग्निरोधक सिलिंडर, टायर,स्क्रॅप वाहने, ट्यूब भंगार साहित्य एकत्रित साठा करण्यात आलेला आहे.
तसेच भंगार गोदामाला लागणाऱ्या आगीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळे वायुप्रदूषण होत असून परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण देखील होत आहे, असे पर्यावरणप्रेमी प्रशांत राऊळ यांनी सांगितले.