- मनपा प्रशासनाने वेळ न वाढविल्याने व्यापाऱ्यांचा पवित्रा
पिंपरी – करोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात सध्या सुरू असलेल्या निर्बंधामुळे दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. त्याशिवाय, शनिवार व रविवारी “वीकेंड लॉकडाऊन’ सुरू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. महापालिका प्रशासनाकडे दुकानांची वेळ वाढवून देण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आता पिंपरीतील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून (दि. 5) सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.
प्रशासनाकडून याबाबत कारवाई करण्यात आल्यास मंगळवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या पिंपरी येथे झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात सध्या दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. अत्यावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता अन्य दुकानांना शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊनमुळे बंद ठेवावी लागत आहे.
दुकानांसाठी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच मर्यादित वेळ दिलेली असल्याने बाजारपेठेत गर्दी होत आहे. दुकानांची वेळ वाढविण्यात आल्यास बाजारपेठांतील गर्दी कमी होईल. त्यामुळे दुकानांसाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी. तसेच, वीकेंड लॉकडाऊनलाही दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. दुकानांसाठी वेळ वाढविल्यास आणि वीकेंड लॉकडाऊनला परवानगी दिल्यास व्यापाऱ्यांना बसणारी आर्थिक झळ कमी होणार आहे.
दुकानांची वेळ सध्या कमी आहे. तसेच, वीकेंड लॉकडाऊनला दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नाही. त्यामुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरीतील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, याबाबत कारवाई झाल्यास मंगळवारपासून बेमुदत बंद पुकारण्यात येईल.
– श्रीचंद आसवानी, अध्यक्ष, पिंपरी मर्चंट फेडरेशन