मुंबई – दिलीप कुमार आणि राज कपूर हे जरी भारतीय असले आणि बॉलीवूडचे कलाकार असले तरी पाकिस्तानातदेखील या दोघांची लोकप्रियता प्रचंड आहे. ते दोघेही मूळचे पेशावरचे असल्याचा त्या परिसरातील लोकांना अभिमान आहे.
दिलीप कुमार आणि राज कपूर या दोघांच्या पेशावर मधील घरांची चर्चा याआधीही बराच काळ सुरू होती. मात्र ती घरे पाकिस्तानात असल्याने त्यासंदर्भातील निर्णय पाकिस्तान सरकारने घ्यायचा होता.
आता बॉलीवूड आणि चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या दोन महान कलाकारांच्या वडिलोपार्जित घरांचे रुपांतर संग्रहालयात करून पाकिस्तान सरकारने त्यांचा सन्मानच केला आहे. भारताबरोबरच पाकिस्तानातील दिलीप कुमार आणि राज कपूरच्या चाहत्यांना यामुळे दिलासा मिळाला असेल.
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने या दोन दिग्गजांच्या पेशावरस्थित वडिलोपार्जित घरांना विकत घेण्यासाठी मंजूरी दिली आहे. पेशावरचे जिल्हा आयुक्त यांनी दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या तेथील वडिलोपार्जित घरांचे सध्याच्या मालकांच्या आक्षेपांना आणि मागण्यांना फेटाळून लावले आहे.
कॅप्टन (सेवानिवृत्त) खालिद महमूद, यांनी या दोन्ही घरांचा ताबा पुरातत्व विभागाकडे देण्याचे आदेश दिले आहेत. पेशावर जिल्हा आयुक्त कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार जमीन (दिलीप कुमार आणि राज कपूर यांचे घर) अधिग्रहण करणाऱ्या विभागाच्या नावे म्हणजेच पुरातत्व आणि संग्रहालय यांच्या संचालकांच्या नावे राहणार आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घराची किंमत दीड कोटी रुपये आणि दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घराची किंमत 80 लाख रुपये निश्चित केली आहे.