हिंजवडी – हिंजवडी, माण, मारुंजी आयटी परिसरातील सोसायट्यांच्या समस्या व शासकीय यंत्रणांच्या अखत्यारीतील प्रश्न सोडविण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय यंत्रणेसोबत बैठक आयोजित केली असल्याची माहिती, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना दिली.
पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील कार्यालयात प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 18) दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला माण, मारुंजी व हिंजवडी परिसरातील सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, प्रलंबित प्रश्न बिल्डरांकडून झालेल्या फसवणुकीबाबत आढावा घेण्यात येणार आहे.
पालिका समावेशाबाबत तर माझी पाच वर्षांपासून मागणी
हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील मूलभूत समस्या व स्थानिक प्रश्न वारंवार बैठका घेऊनही सुटत नसल्याने मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ही गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली. याबाबत सुळे यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, त्यांनी तर आता मागणी केली. या भागाचा नियोजनबद्ध सर्वांगीण विकास व्हावा म्हणून गेल्या पाच वर्षांपासून मी ही मागणी करत आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येचा विचाराबाबत सरकारला गांभीर्य नाही.