पिंपरी, दि. 24 – देहूरोड येथील दारूगोळा कारखान्याच्या ना-विकास क्षेत्र (रेडझोन) मुळे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील नागरिकांना अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्याबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच बैठक घेतील, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार (दि.24) विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषदेत उमा खपरे यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, राज्यातील संरक्षण खात्याशी संबंधित विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत राज्यातील कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री यांची भेट घेऊन या प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करण्यात येईल.
संरक्षण विभागाने अनेक ठिकाणी संरक्षित ना-विकास क्षेत्र (रेड झोन) जाहीर केले आहेत. त्यामुळे त्या भागातील विकास योजना राबविताना अडचणी जाणवतात. देहूरोड येथील दारूगोळा कारखान्याच्या या रेडझोन मुळे पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील नागरिकांना अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे या विषयावरही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्याबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे लवकरच बैठक घेतील.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी संरक्षण विभागाने रेड झोन हद्द घोषित केली आहे. मात्र, रेड झोनचे अंतर हे सर्व ठिकाणी वेगवेगळे आहे. त्यामुळे नागरिकांना घरे बांधताना किंवा बांधकाम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेड झोनमध्ये जागा असल्याने बांधकाम करता येत नाही. तसेच, बॅंका बांधकामासाठी कर्ज देत नाहीत. रेड झोनच्या अंतराबाबत संभ्रम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. यामध्ये स्पष्टता यावी यासाठी शहरातील रेड झोडचा नवा नकाशा प्रसिद्ध करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी विधानपरिषदेत नुकतीच केली होती.