जिनिव्हा – कोविड-19 च्या रुग्णांवर सध्या हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या ज्या चाचण्या सुरू होत्या, त्या स्थगित करण्यात येत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस घेब्रेयसिस यांनी काल स्पष्ट केले.
यापूर्वी, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, लॅन्सेट मेडिकल जर्नलने “एचसीक्यू’ आणि क्लोरोक्वीनवर एक निरीक्षण आणि रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड -19 च्या रुग्णांवर या औषधांमुळे होणारा परिणामांचा अभ्यास प्रकाशित केला होता. जेंव्हा केवळ “एचसीक्यू’ आणि क्लोरोक्वीन ही औषधे दिली जातात किंवा मॅक्रोलाईदबरोबर ही औषधे दिली जातात, तेंव्हा मृत्यूदरात वाढ होते, असे या निरीक्षणात म्हटले आहे.
“एचसीक्यू’चा समावेश असलेल्या चार औषधांचा स्वतंत्रपणे किंवा एकत्रित संयुगांच्या माध्यमातून उपचार केल्यास त्याचा कोविड-19 च्या रुग्णांवर कसा आणि किती परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने चाचणी घेण्यास सुरुवात केली गेली आहे. या चाचणीसाठी नियुक्त केलेल्या समितीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेमध्ये प्रतिनिधी असलेल्या 10 देशांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस या समितीची बैठक झाली.
जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या सर्व पुराव्यांचे सर्वंकष विश्लेषण आणि महत्त्वाच्या मूल्यांकनाचे पुनरावलोकन करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यानुसार हायड्रोक्सिक्लोरोक्वीनबाबत जगभर झालेल्या चाचण्यांचे निष्कर्श आणि उपलब्ध डाटाचे अवलोकन या समितीकडून केले जाणार आहे. त्यानंतरच हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून निकष निश्चित केले जाऊ शकतील, असे घेब्रेयसिस यांनी सांगितले.