मंचर- निघोटवाडी-लांडकमळा (ता. आंबेगाव) येथील अनिता भेके (वय 59) या बेपत्ता महिलेचा मृतदेह परिसरातील विहिरीत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनिता भेके ही महिला मनोरुग्ण असुन तिच्यावर उपचार सुरु होते. ती शनिवारी (दि. 18) सकाळी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. याबाबत सदर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार स्वप्निल भेके यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली.
तक्रार देऊन घरी येत असताना लांडकमळा परिसरात शोध घेतला असता, येथील खंडू निघोट यांच्या विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. याबाबत स्वप्निल भेके यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी व ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढून मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे नेले असता, डॉक्टरांनी महिला मृत झाल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस जवान गणेश डावखर करीत आहेत.