पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्या पाठोपाठ आलेल्या महापौर तसे उपमहापौरपदाच्या निवडीमुळे महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा रखडल्या आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेच्या क्रीडा समितीलाही या स्पर्धांचा विसर पडला असल्याने आता या स्पर्धा जानेवारी ते मार्च या कालावधीत 10 वी 12 वी तसेच शालेय परीक्षांच्या कालावधीत होणार आहेत. त्यातच 31 मार्च 2020 पूर्वी या स्पर्धा घेणे आवश्यक असल्याने अतिशय घाई गडबडीने या स्पर्धा घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडून शहरातील उद्योन्मुख खेळाडू तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महापौर चषक स्पर्धा घेतल्या जातात, त्यात 20हून अधिक वेगवेगळ्या स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धा निश्चित करण्याचे तसेच त्याचे संयोजक निवडण्यासह इतर सर्व अधिकार हे महापौरांना असतात. गेल्या काही वर्षांत या स्पर्धा जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीत घेतल्या जात होत्या, त्यामुळे ऐन शालेय परीक्षा तसेच स्पर्धा घाईगडबडीने उरकण्यात येत असल्याने खेळाडूंकडून त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत पालिकेकडून ऑक्टोबर महिन्यात पावसाळा संपताच त्याची सुरुवात करण्यात येते.
मात्र, यावर्षी सत्ताधारी भाजपला या स्पर्धांचा विसर पडला असल्यासारखे चित्र आहे. महापालिकेची क्रीडा समिती तसेच महापौरपद भाजपकडे असले तरी अद्याप या स्पर्धांबाबत प्रशासनाकडून काहीच तयारी केलेली नाही. तसेच, पदाधिकाऱ्यांकडूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या स्पर्धांचे प्रस्ताव अद्याप तयार झालेले नाहीत. तसेच, त्यासाठीच्या आवश्यक त्या मान्यताही झालेल्या नाहीत. त्यातच, आता महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याने डिसेंबर महिनाही त्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा स्पर्धा उशिरा आणि गडबडीने होणार असल्याचे चित्र आहे.