नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेतील महापौर निवडणुकीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहचला असून त्यावर आता 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. आम आदमी पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार शेली ओबेरॉय यांनी दिल्लीतील महापौरपदाची निवडणूक कालबद्ध पद्धतीने सुनिश्चित करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे.
सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने या याचिकेवर 3 फेब्रुवारीला रितसर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. यात आप याचिकाकर्त्याच्यावतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी आज प्राथमिक युक्तिवाद केला. दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक या महिन्यात दुसऱ्यांदा नगरसेवकांनी केलेल्या गदारोळामुळे रखडली. त्यानंतर उपराज्यपाल-नियुक्त पीठासीन अधिकाऱ्याने अनिश्चित काळासाठी महापालिकेचे कामकाज तहकूब केले.
आपचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी या प्रकरणात भारतीय जनता पार्टी वर गुंडगिरीचा आरोप केला आहे. भाजपने गेले अनेक महिने दिल्ली महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून आपल्या हातात ठेवला आहे. ते म्हणाले की आम्ही सुप्रीम कोर्टात दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत, पहिली म्हणजे वेळेत महापौरांची निवड करणे आणि राज्यपाल नियुक्त नगरसेवकांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यास मनाई करणे.