शिवशंकर निरगुडे
हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील तरुण प्रगतशील शेतकरी राहुल उर्फ गणेश कव्हर यांनी पारंपरिक पिकाला बगल देत चिया या पिकांची लागवड केली आहे. बागायती व जिरायती शेतीला उत्तम पर्याय म्हनूण या पिकांकडे पहिले जाते. हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा येथील युवा शेतकरी राहुल कव्हर सुधारित तंत्रपद्धतीने शेती करून त्याचे फायदे मिळवतात.
सोयाबीनची गादीवाफा पद्धतीने टोकण, हळदीत त्याचे आंतरपीक, कांदा बीजोत्पादन आदी विविध प्रयोगांमधून त्यांनी उत्पादकता वाढविण्याबरोबर आर्थिक सक्षमता मिळवली आहे. येथील तरुण प्रयोगशील शेतकरी राहुल कव्हर यांना 12 एकर शेती आहे. मध्यम प्रकारची माळरानाची, दगड गोटे असलेली जमीन आहे. विहीर, तलाव, छोटे शेततळे आदींचा आधार आहे. पूर्वी वडील शेती पाहत. पाच वर्षांपासून ही जबाबदारी राहुल यांनी पेलली आहे.
खरिपात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हळद तर रब्बीत हरभरा, गहू ही प्रमुख पिके ते घेतात. चार वर्षांपासून ते कांदा बीजोत्पादनात सक्रिय आहेत. राहुल आणि बंधूंचे संयुक्त कुटुंब होते. त्या वेळी ट्रॅक्टरसह अन्य अवजारे, बैलजोडी होती. विभक्त झाल्यानंतर त्यांनी यंत्र अवजारांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा भाडेतत्वावर उपलब्ध ट्रॅक्टरद्वारे मशागत, पेरणी, लागवड, काढणीची कामे करण्यास प्राधान्य दिले. आता त्यांनी त्यांच्या शेतात गहू हरभरा पिकाला बगल देत चिया पिकांची लागवड केली आहे.
दोन एकर मध्ये त्यांनी चिया पिकांची लागवड केली एका एकर मधील चिया पिक हें सध्या फुलांच्या अवस्थेमध्ये आहे. ह्या पिकाला तब्बल 3 महिने लागतात. त्यामुळे आता त्याचे पिक एका महिन्यात घरी येईल. आता पुन्हा एक एकरमध्ये त्यांनी चिया पिकांची लागवड केली आहे. तब्बल दोन एकर मध्ये त्यांनि चिया लागवड केली आहे आणि त्याला एकरी किमान चार किण्टल उत्पादन अपेक्षित आहे आणि याला 12 हजार ते 17 हजार रुपये किण्टल भाव मिळतो. एकरी सरासरी 60 हजार रुपयांचे मिळतात.
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील प्रगतशील शेतकरी व विविध पुरस्काराने सन्मानित झालेले राहुल उर्फ गणेश कव्हर यांनी पारंपारिक हरभरा पिकाला बगल देत चिया या पिकाची पेरणी केली असून हरभऱ्यापेक्षा या पिकाला मार्केटमध्ये चांगली किंमत मिळते. विशेषता या पिकाला रोही रानडुक्कर याचा काहीही त्रास नसून उत्पादनामध्ये देखील भर पडते असे त्यांनी सांगितले.
यावर्षी त्यांनी या पिकाची पेरणी केली असून जवळपास दोन एकर मध्ये पेरणी केली असून चिया या पिकाला उतार देखील चांगला येत असल्याने त्यांनी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथील पीक शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन या वानाची पीक घेतले. गतवर्षी त्यांनी राजमा या पिकाची पेरणी केली होती. यावर्षी पारंपारिक पीक असलेल्या हरभरा या पिकाला बगल देत त्यांनी चीया या पिकाची पेरणी केली असून उत्पादन चांगले येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर पीक दोन महिन्याचे झाले असून सध्या हे पीक फुलांमध्ये आहे. एकंदर प्रगतशील शेतकरी राहुल उर्फ गणेश कव्हर यांनी चीया या पिकाची पेरणी केली असून भरघोस उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. नेहमीच शेतीमध्ये ते विविध प्रयोग करून पाहतात व उत्पादनामध्ये भर टाकतात. त्यांची क्रशी विभाग व कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तसेच बायफ या संस्थेने दखल घेतली असून त्यांना आतापर्यंत 10 ते 12 पुरस्कार शेती विषयी मिळाले आहेत. अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन विविध पिकाची पेरणी करणे काळाची गरज असल्याची त्यांनी सांगितले.