- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
- मार्चपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे निर्देश
पिंपरी – मावळ तालुक्यात पवना धरणामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा वाव आहे. त्यामुळे मावळमधील प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 26 मधील जवन ते शिळींब-मोरवे-घुसळखांब आणि प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 106 या रस्त्यांची हायब्रीड न्युईटी अंतर्गत कामे करण्यासाठी तातडीने 25 कोटी रुपये देण्यात येणार आहे. येत्या मार्चपर्यंत या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 20) दिले.
मावळ तालुक्यातील जवन-घुसळखांब या गावांमध्ये असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्र.26 व 106 च्या कामासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी हे निर्देश दिले. सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे यांच्यासह पुण्याचे मुख्य अभियंताही “व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठकीस उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील शिळींब गावामधून जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग 26 व 106 या रस्त्याची एकूण 19.8 कि.मी. लांबी आहे. त्यापैकी 11.95 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण व 7.13 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण “हायब्रीड न्युईटी’ अंतर्गत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामासाठी परवाने मिळाले असून, हे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.