मंचर- आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ (निगडाळे) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने करोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली, तसेच नागरिकांना मास्क आणि साबणाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती सरपंच दीपक चिमटे व ग्रामविकास अधिकारी अशोक शेवाळे यांनी दिली.
ग्रामपंचायतच्या माध्यमातून भीमाशंकर, निगडाळे, म्हतारबाची वाडी,कोंढवळ, ढगेवाडी, तेरुंगण व घोटवाडी येथे औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आला. प्रत्येक कुटुंबियांना घरोघरी जाऊन सुरक्षित अंतर ठेवून स्वच्छतेसाठी साबण व मास्क वाटण्यात आले. तसेच मुंबई व पुणे तसेच परजिल्ह्यातून गावात आलेल्या कुणाला सर्दी, खोकला किंवा ताप यांसारखी लक्षणे आहेत का, याबाबतची घरोघरी जाऊन माहीती घेतली जात आहे.