अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीच इशारा : हजार रुपयांचा दंड आकारणार
मंचर- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे गावामध्ये बाहेर गावावरून आलेल्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, तसेच कोणी लपून-छपून व्यवहार करताना आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच पवनकुमार हिले आणि उपसरपंच सचिन हिंगे यांनी दिली.
अवसरी बुद्रुक गावामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना जिल्हा परिषद शाळेमध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे.वाचनालय चौक आणि रघुनाथ दळवींच्या घरासमोरील चौक या दोन ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. गावामध्ये येताना व गावामधून जाताना प्रत्येक व्यक्तीने निर्जंतुकीकरण कक्षामधून स्वतःला निर्जतुकीकरण करणे बंधनकारक आहे. किराणा,भाजीपाला, पीठ गिरणी, खते-औषधे, दूध विक्रेते केंद्र आणि इतर दुकाने रोज दुपारी 12 ते 3 यावेळेतच सुरू राहतील. सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत मेडिकल दुकाने दररोज सुरू राहतील, तसेच गैरकृत्य करणाऱ्याला पकडून देणाऱ्यास 500 रुपये बक्षिसे देण्यात येईल, असे उपसरपंच सचिन हिंगे यांनी सांगितले.