झेंडू, गुलछडीच्या दरामध्ये दुप्पट वाढ

  • नवरात्री सुरु होताच मागणी वाढली : पावसामुळे खराब झाली फुले

पिंपरी – गेल्या अनेक दिवसांपासून नाममात्र दरात विकल्या जाणाऱ्या झेंडू, गुलछडी आदी फुलांच्या दरामध्ये नवरात्रोत्सवामुळे दुप्पट वाढ झाली आहे. तुलनेत अन्य फुलांचे दर मात्र स्थिर आहेत. मंदिरांमध्ये आणि घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे देवीच्या पुजेसाठी फुलांना मागणी आहे. तथापि, पावसामुळे फुले खराब झाली असल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

सुक्‍या झेंडूला सध्या 60 ते 100 रुपये किलो भाव मिळत आहे. आठवडाभरापूर्वी त्याचा दर 20 ते 30 रुपये किलो होता. पिवळा ओला झेंडू 20 ते 60 रुपये किलो, छोटा झेंडू (कापरी) हा 60 ते 80 रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. कलकत्ता झेंडूला 80 ते 120 रुपये प्रति किलो हा दर मिळत आहे.

गुलछडीच्या फुलांचा दर प्रति किलो 80 ते 100 रुपये इतका होता. सध्या 200 ते 250 रुपये या दराने गुलछडीची फुले विकली जात आहेत. म्हणजे गुलछडीच्या दरामध्ये दुपटीहून आधिक वाढ झाली आहे. अन्य फुलांचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती फुल विक्रेते गणेश आहेर यांनी दिली.

पावसामुळे फुले भिजली आहेत. त्यामुळे फुले खराब झाल्याने फुलांना अपेक्षित बाजार मिळत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्ड येथून नवरात्रोत्सवानिमित्त फुलांची चांगली आवक झाली आहे. झेंडू आणि गुलछडी वगळता अन्य फुलांचे दर मात्र स्थिर आहेत. नवरात्रीनिमित्त विड्याच्या पानांना देखील चांगली मागणी आहे.

फुलांचे दर (प्रति किलो रुपयांत) : पिवळी शेवंती : 160 ते 200, ऍस्टर : 120 ते 200, राजा शेवंती : 160 ते 200, तुकडा गुलाब : 150 ते 200, तिळाची फुले : 600, डच गुलाब गड्डी : 120 ते 150, चाफा पुडी : 10 ते 20, काकडा बंडल : 250 ते 300.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.