विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना आर्थिक फटका

  • इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान

जाधववाडी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट गावांमध्ये महावितरणाकडून घरगुती वापरासाठी करण्यात येणारा वीजपुरवठा सुरळीत होत नाही. विद्युतपुरवठा सातत्याने कमी-जास्त दाबाने होत असल्याने घरगुती इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांना फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागत आहे. तरी महावितरण विभागाने सुरळीत विद्युतपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाधववाडी परिसरात सातत्याने कमी-जास्त दाबाने विद्युतपुरवठा करण्यात येत आहे. अचानकपणे कमी-उच्च दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरातील महागड्या विजेच्या उपकरणांचे नुकसान होत आहे. महावितरणकडून घरगुती वापरासाठी साधारण 230 व्होल्ट दाबाने विद्युतपुरवठा केला जातो. परंतु सकाळी व सायंकाळी या व्होल्टेजचे प्रमाण कमी जास्त होत आहे.

सकाळ व सायंकाळी साधारण 100 व्होल्ट कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. म्हणजेच 130 व्होल्ट दाबानेच वीजपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी कमी दाबामुळे देखील अनेक उपकरणांना नुकसान पोहोचत आहे. त्यामुळे महावितरण विभागाने याची दखल घेऊन सकाळी व सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे सुरक्षित राहवित म्हणून होम प्रोटेक्‍टर बसविले आहेत. त्यामध्ये वीजपुरवठा किती दाबाने होत आहे ते दाखविले जात आहे. कमी अथवा जास्त दाबाने वीजपुरवठा झाला तर ही उपकरणे आपोआप बंद होत आहेत. परंतु बहुतांश घरांमध्ये अशी व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

किमान चार ते सहा तास विद्युतपुरवठा बंद राहत आहे. नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. घरातील आवश्‍यक असे फ्रिज, वॉशिंग मशीन अशी महागडी उपकरणे वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने व्यवस्थित चालत नाहीत. त्यामुळे गृहिणींसाठी महावितरणची सुविधा डोकेदुखी ठरत आहे. रोज सकाळी व सायंकाळी घरात कामांची गडबड असते त्याच वेळी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी नाराजी आहे.

कमी-जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या घरगुती उपकरणांचे नुकसान झाले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.

लाइनमन देतात गोलमाल उत्तरे
त्या प्रभागातील अथवा भागाशी संबंधित असणाऱ्या लाइनमनला वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याबाबत विचारणा केली असता ते गोलमाल उत्तरे देत आहेत. जाधववाडी परिसरात भूमिगत वीज जोडणीची कामे पूर्ण झाली असली तरीही शेतीची जुनी लाइन असल्याने पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे येथे नवीन रोहित्र बसविण्याची गरज आहे. या भागासाठी रोहित्र मंजूर झाले असून जागेअभावी रोहित्राचा काम रखडले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.