Maratha Reservation – मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनाला या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यात हिंसक वळण लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक झालेल्या आंदोलकांनी राज्याच्या या भागात तोडफोड केल्याच्या आणि तुरळक ठिकाणी जाळपोळ केल्याच्या घटना घडल्याच्या बातम्या आहेत.
तीन तहसिलदारांच्या गाड्यांची तोडफोड झाली असल्याच्या बातम्या आहेत. पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलकांचे निवेदन स्विकारण्यास नकार दिल्यामुळे परभणी जिल्ह्यातील मनोली येथे तहसिलदारांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. मनोली येथे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांनी आंदोलन सुरू केले आहे.
तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी निवेदन स्विकारण्यासाठी टाकीवर येण्याची विनंती गावकऱ्यांनी त्यांना केली. त्यांनी यास नकार दिल्यामुळे आक्रमक तरूणांनी त्यांची गाडी फोडली. गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सध्या तणावाचे वातावरण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केवळ मनोलीच नाही तर अन्यत्रही शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर रोष व्यक्त केल्याच्या घटना समोर येत आहेत. जालन्यातील बाजीउम्रद येथेही तहसीलदारांनी चर्चेसाठी यावे अशी मागणी आंदोलकांनी केली होती. आंदोलक मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत.
यावेळी आंदोलन स्थळाजवळून जाणाऱ्या तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. बीडच्या आष्टी येथेही तहसीलदारांच्या वाहनाला आग लावण्याची घटना घडली आहे. तहसीलदार प्रमोद गायकवाड यांचे वाहन त्यांच्या घराच्या आवारात उभे करण्यात आले होते. तेथेच त्याला काल रात्री आग लावण्यात आली.
बससेवा ठप्प..!
मराठवाड्याला या आंदोलनाची सगळ्यांत जास्त झळ बसते आहे. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्यामुळे बससेवा बंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरसह विभागातील सर्वच जिल्ह्यांतील बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.