पुणे – मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरतर्फे दिले जाणारे उद्योजकासाठीचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. मात्र प्रत्यक्ष पुरस्कार वितरण नंतर करण्यात येईल असे चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता आणि महासंचालक प्रशांत गीरबाने यांनी सांगितले.
उद्योजकतेतील नावीन्याचा जी. एस. पारखे पुरस्कार अर्थ केअर इक्विपमेंटस, रॅमलेक्स, व्हीस्मार्ट इन्फोटेक या कंपन्यांना संयुक्तपणे देण्यात आला आहे. नवीन उत्पादनाचा हरी जोशी व मालिनी जोशी पुरस्कार क्वांटेशिया मेडिकल टेक्नॉलॉजीज या कंपनीला जाहीर झाला. महिला उद्योजकासाठीचा रमाबाई जोशी पुरस्कार ब्लींक ग्रीन कंपनीला देण्यात येणार आहे.
सामाजिक उपक्रमासाठीचा बी. जी. देशमुख पुरस्कार टाटा मोटर्स, भारत फोर्ज याना संयुक्तरित्या जाहीर झाला तर कल्याणी टेक्नॉलॉजीला प्रशस्तीपत्र मिळणार आहे. संरक्षण क्षेत्रातील लघुउद्योगाच्या उत्पादनासाठी या वर्षापासून ब्रिगेडियर एस. बी. घोरपडे पुरस्कार देण्यात येत आहे. या वर्षी हा पुरस्कार अनंत डिफेन्स सिस्टिमला मिळणार आहे. आयनाव्हीट सिस्टम्स् इंडिया, प्रोटॉन मेटलक्राफ्ट या कंपन्यांना प्रशस्तीपत्र मिळणार आहे.
पहिल्या पिढीच्या उद्योजकासाठी दिला जाणारा किरण नातू उद्योजकता पुरस्कार टी टी इन्फ्रा या कंपनीला जाहीर झाला असून व्हीजन इंडिया सॉफ्टवेअर एक्स्पोर्टस्, लिगल लॉजिक कन्सल्टींग या कंपन्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त प्रवेशीका आल्याचे दिसून आले. हरित उद्योजकतेसाठीचा पुरस्कार आर. जे. राठी पुरस्कार मोठ्या गटात किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीला तर मध्यम गटात अद्विक हाय-टेक या कंपनीला जाहीर झाला आहे.