सातारा – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करून, संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करणाऱ्या आणि राज्य शासनाला हादरवून सोडणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांची तोफ साताऱ्यात धडाडणार आहे. त्यांची सभा शनिवारी (दि. 18) गांधी मैदानावर होणार आहे.
या सभेचे नियोजन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आल्याची माहिती समन्वय समिती सदस्यांनी दिली.जरांगे-पाटील यांच्या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाची बैठक साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये नुकतीच झाली. मराठा आरक्षणाबाबत जनजागृतीसाठी जरांगे यांचा दौरा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. सध्या ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
मायणी, ता. खटाव आणि मेढा, ता. जावळी येथील सभांनंतर शनिवारी (दि. 18) रोजी मनोज जरांगे यांची भव्य सभा गांधी मैदानावर होणार आहे. या सभेला सातारा तालुक्यातील 194 गावांमधील हजारो मराठा समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती समन्वय समितीचे सदस्य व पत्रकार शरद काटकर यांनी दिली. मराठा आरक्षणाचा निर्णय मुदतीत न झाल्यास, मंत्रालयात खर्डा-भाकरी आंदोलन करण्याचा असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे गांधी मैदानावरील सभेत ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागूले आहे.