राज्यसभा पोटनिवडणूक: विजयाची केवळ औपचारिकता बाकी
जयपूर -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळवारी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. राजस्थानात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसकडे विधानसभेत बहुमत असल्याने मनमोहन यांचा विजय ही केवळ औपचारिकताच ठरणार आहे.
भाजपचे नेते मदनलाल सैनी यांच्या निधनामुळे राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाची एक जागा रिक्त झाली आहे. त्या जागेसाठी 26 ऑगस्टला पोटनिवडणूक होणार आहे. त्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने सध्या संसदेच्या कुठल्याच सभागृहाचे सदस्य नसणाऱ्या 86 वर्षीय मनमोहन यांना उमेदवारी दिली.
अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसबरोबरच राजस्थानमधील जनतेचे आभार मानले. अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि कॉंग्रेसचे त्या राज्यातील इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
मनमोहन तब्बल तीन दशके आसाममधून राज्यसभा सदस्य बनले. त्यांची मुदत 14 जूनला समाप्त झाली. आता त्यांना राजस्थानमधून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या राज्यातून राज्यसभेवर 10 जागा निवडून दिल्या जातात. उर्वरित 9 जागांवर भाजपचे सदस्य आहेत.