देवयानी देशपांडे
कोणत्याही संस्थेचा (शासकीय किंवा खासगी) विचार करता, कार्यक्षमता म्हणजे “केवळ नफ्यात वाढ’ असा अर्थ अभिप्रेत नसून त्यात उत्तरदायित्व, निर्णयक्षमता, विवेक असे अनेक घटक समाविष्ट आहेत. यातूनच पुढे अभिशासन आणि सुशासन या संकल्पना अधोरेखित होतात. कोणत्याही समस्येचा सर्वांगीण विचार करताना कार्यकर्त्याचा पुरेपूर कस लागतो हे देखील खरेच!
“शासनाच्या परिघातील नेमकी कार्ये कोणती आणि आवश्यक पैसा आणि ऊर्जेचा वापर करून ही कार्ये सर्वाधिक कार्यक्षमतेने सिद्धीस कशी नेता येतील’ हे समजून घेणे हेच प्रशासन अभ्यासाचे उद्दिष्ट होय, असे वूड्रो विल्सन यांनी म्हटले होते. समाजातील वाढत्या गुंतागुंतीचा परिणाम म्हणून सेवा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या, म्हणजेच, प्रशासनाच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त होते. तसेच, शासकीय कार्यांची रुंदावणारी कक्षा ध्यानात घेता, कार्य सिद्धीस नेताना कार्यक्षमता, परिणामकारकता आणि व्यवहार्यता या संकल्पना अधोरेखित होतात. “उद्दिष्टे कशी’ साध्य करता येतील आणि “त्यासाठी कोणत्या’ दिशेने प्रयत्न करावे हे पाहणे रोमांचक ठरते. शासनाच्या कार्यक्षमतेचा विचार करणारी आणि व्यावहारिक बाजू ध्यानात घेणारी अभ्यासशाखा म्हणून लोकप्रशासन या स्वतंत्र अभ्यासशाखेचे महत्त्व अधोरेखित होते.
“कार्यक्षमता’, “परिणामकारकता’ आणि “व्यवहार्यता’ या तीनही संज्ञा लोकप्रशासन अभ्यासशाखेत सातत्याने वापरल्या जातात. सार्वजनिक सेवांचा पुरवठा कार्यक्षम आणि परिणामकारक पद्धतीने व्हावा, त्याची व्यावहारिक बाजू ध्यानात घ्यावी हा यामागचा प्रमुख हेतू होय. पैकी, कार्यक्षमता ही खरेतर कोणत्याही संघटनेची कोनशिलाच होय. परंतु, काही घटकांमुळे प्रशासकाची कार्यक्षमता प्रभावित होते. एकावेळी अनेक जबाबदाऱ्या, आवश्यक नियंत्रणाचा अभाव, उत्तरदायित्वाचा अभाव, निर्णयप्रक्रियेत समाविष्ट अनेक पातळ्या आणि कामाच्या सुरक्षिततेचा अभाव यामुळे शासकीय संस्थांकडून अपेक्षित असणारी कार्यक्षमता पातळी अभावानेच पाहायला मिळते. परंतु, अपवादानेच नियम सिद्ध होतो. प्रत्येक प्रशासक कार्यक्षमतेने उद्दिष्टप्राप्ती करू शकतो. याचे एक व्यावहारिक उदाहरण पाहूया.
मध्य प्रदेशातील आयएएस अधिकारी आशिष सिंग यांच्या उल्लेखनीय कामाची सध्या चर्चा आहे. त्यांच्या उदाहरणातून “कार्यक्षमता’, “परिणामकारकता’ आणि “व्यवहार्यता’ म्हणजे नेमके काय आणि ते कसे साध्य करता येईल हे समजून घेऊया. 2018 साली इंदोर येथे नियुक्ती झाल्यानंतर आशिष यांनी कचरा व्यवस्थापनाचे काम हाती घेतले. कचऱ्याचा निचरा करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला नेमकी समस्या शोधून काढली. निचरा करण्यासाठी मोजावी लागणारी भली मोठी किंमतही ती समस्या होती. पूर्वीच्या प्रारूपानुसार सरकारने हे काम खासगी कंपन्यांकडे दिले होते. या कंपन्या प्रति क्युबिक मीटर रुपये 475 इतके मूल्य आकारत होत्या. म्हणजेच, कामाचा एकूण खर्च रुपये 60-65 कोटींच्या घरात जात असे.
आशिष सिंग यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर केवळ रुपये 10 कोटी इतका खर्च केला. खरी समस्या मूल्य आकारणीची आहे हे ध्यानात आल्यावर त्यांनी निचरा करण्याची यंत्रे भाड्याने घेण्याचे ठरवले. दरमहा भाडे प्रति यंत्र रुपये 7 लाख इतके होते. उपलब्ध शासकीय संसाधनांचा वापर करून रोज 14-15 तास ही यंत्रे वापरली जात. याचा परिणाम म्हणून केवळ सहा महिन्यांत 13 लाख टन इतक्या कचऱ्याचा निचरा करण्यात यश आले, असे ते म्हणतात. आता हे प्रारूप संपूर्ण भारतभर देखील लागू करता येईल.
“कार्यक्षमता’, “परिणामकारकता’ आणि “व्यवहार्यता’ या संकल्पना समजून घेण्यासाठी उपरोक्त उदाहरण चोख आहे.
कार्यक्षमतेशी संबंधित काही नेमके टप्पे प्रस्तुत उदाहरणामध्ये अंतर्भूत आहेत :
(1)नेमकी समस्या शोधून काढणे किंवा समस्येच्या मुळापर्यंत जाणे.
(2)उपलब्ध पर्याय विचारात घेणे.
(3)निवडलेल्या पर्यायानुसार खर्चाची गोळाबेरीज.
(4)योग्य पर्यायाची निवड. (येथे निर्णयक्षमता अधोरेखित होते)
(5)उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर.
(6)कमीतकमी वेळात कार्यपूर्ती. (म्हणजे अनावश्यक विलंब टाळणे होय)
थोडक्यात, कार्यक्षमता, म्हणजे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता होय. यासाठी उपरोक्त टप्पे विचारात घ्यावे लागतात. असे करताना “दर्जात्मकते’ला कोणताही धक्का लागणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक ठरते. तांत्रिक भाषेत कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध संसाधने आणि त्यांच्या वापरातून होणारी “फलनिष्पत्ती’ होय. म्हणजेच, आदाने आणि फलनिष्पत्तीचे समीकरण! याव्यतिरिक्त कार्यक्षमतेला तंत्रज्ञानाची जोड मिळाली असता कार्यक्षमता अधिकाधिक वृद्धिंगत होते.
कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान
निवृत्त आयएएस अधिकारी श्रीयुत अनिल स्वरूप यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या “नॉट जस्ट अ सिव्हील सर्व्हन्ट’ या स्मृतीसंग्रहात राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेच्या बांधणीची संपूर्ण प्रक्रिया तपशीलवार नमूद केली आहे. या योजनेच्या उभारणीची कथा कार्यक्षमता, परिणामकारकता आणि व्यवहार्यतेला तंत्रज्ञानाची जोड प्रकट करणारी आहे. इतक्या प्रचंड प्रमाणावर आरोग्य विमा लागू करण्याची ही जगातली पहिलीच वेळ होती. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली. प्रस्तुत योजनेच्या बांधणीप्रक्रियेतून कार्यक्षमता, परिणामकारकता आणि व्यवहार्यता या तीनही संकल्पना समजून घेता येतात.
कोणत्याही संस्थेचा (शासकीय किंवा खासगी) विचार करता, कार्यक्षमता म्हणजे “केवळ नफ्यात वाढ’ असा अर्थ अभिप्रेत नसून त्यात उत्तरदायित्व, निर्णयक्षमता, विवेक असे अनेक घटक समाविष्ट आहेत. यातूनच पुढे अभिशासन आणि सुशासन या संकल्पना अधोरेखित होतात. अशाप्रकारे, कोणत्याही समस्येचा सर्वांगीण विचार करताना कार्यकर्त्याचा पुरेपूर कस लागतो हे देखील खरेच!